राजू पोवार : रयत संघटनेने घेतली तहसीलदारांची भेट
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील पावसाला निपाणी तालुक्यात सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वेदगंगा, दूधगंगा आणि पंचगंगा नद्यांची पाणीपातळीही वाढल्याने आठवड्याभरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. तसेच घरे व इतर मालमत्तेचे नुकसान होणार नाही याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी रयत संघटनेचे चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांनी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांच्याकडे केली.
बुधवारी (ता.६) रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निपाणी तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी राजू पोवार म्हणाले, निपाणी तालुक्यातून वाहणाऱ्या चारही नद्यांची पाणीपातळी सध्या वाढत आहे. त्यामुळे नदी काठावरच्या गावातील नागरिक तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी तालुका प्रशासनाने आतापासूनच तयारी करावी. याशिवाय २०१९ व २०२१ मधील महापुरामुळे पिके आणि घरांची नुकसान भरपाई अजूनही अनेक लाभार्थींना मिळाली नसून ती तात्काळ द्यावी. केंद्राच्या अतिवृष्टी व पूर परिस्थिती मधील नुकसानभरपाईची निपक्षपातीपणे सर्वे करून सरसकट सर्व शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली. तहसीलदार डॉ. भस्मे यांनी, आपल्या कार्यकाळात एकही पात्र व्यक्ती अतिवृष्टी आणि महापुराच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेली नाही. यावेळीही पूरस्थितीसंदर्भात दीड महिन्यापूर्वीच पूर्वबैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. पूरस्थिती आढळण्यास प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले.
यावेळी सर्जेराव हेगडे, रमेश पाटील, भगवंत गायकवाड यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.