लक्ष्मणराव चिंगळे : १० लाख कार्यकर्त्यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि दिन, दलित, अल्पसंख्यांक, शोषितांचे कैवारी सिद्धरामय्या त्यांचा अमृत महोत्सव उद्या बुधवारी (ता.३) दावणगिरी शहराबाहेर होणार आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. सोमवारी (ता.१) सकाळी आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
चिंगळे म्हणाले, दावणगिरी शहराबाहेरील तीनशे एकरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील पन्नास हजार तर राज्यभरातून काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते असे दहा लाख कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यासाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांचे सहकार्य लाभले आहे. त्या दृष्टीने सर्व प्रकारचे नियोजन केले आहे. व्यासपीठावर २५० मान्यवरांची व्यवस्था केली असून शंभर एकरात मंडप उभारण्यात आला आहे. ५० एकरामध्ये चहापाणी जेवणासाठी पावसाच्या पार्श्वभूमीवर जर्मन पद्धतीचा मंडप घातला आहे.
या सोहळ्यामध्ये माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, आमदार गणेश हुक्केरी, राजू कागे, लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, ए. बी. पाटील, चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेसचे नेते मंडळी, कार्यकर्ते व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यास निपाणी, चिकोडी, बेळगाव विभागातील कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन चिंगळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta