दूधगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात, नदीचे प्रदूषण रोखणे गरजेचे
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी (तालुका निपाणी) येथील दूधगंगा नदीच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूलाही कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दूधगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. लोकांचे आरोग्य धोक्याचे बनत असल्याने या नदीचे प्रदूषण रोखणे गरजेचे आहे.
दूधगंगा नदी कर्नाटक व महाराष्ट्राला वरदान ठरली आहे. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहणारी ही नदी पूर्वेला कृष्णा नदीला मिळते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी येथे नदीवर मोठा पूल बांधण्यात
आला आहे. कागल आणि कोगनोळी ही नदीशेजारील दोन मोठी गावे आहेत.
गावातील काही व्यावसायिक नदीच्या शेजारी आणि नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा कचरा टाकत आहेत. त्यामुळे नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीच्या कागल व कोगनोळीकडील बाजूस हॉटेल, चिकन शॉप आणि कपड्यांची शिलाई करणाऱ्या व्यावसायिकांनी कचरा टाकला आहे. गेली काही वर्ष या ठिकाणी सातत्याने कचरा टाकला जातो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने नदीपात्रातही कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे नदीच्या दोन्ही काठावर मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिला आहे. प्रकारामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. नदीतूनच शेतीसह अनेक गावे आणि शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. बहुतांशी गावे आणि
शहर दूधगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नदीतील प्रदूषण वाढत गेले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आवासून निर्माण होणार आहे. त्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी चळवळ उभी करणे काळाची गरज बनली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta