संजय देसाई : दोशी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन
निपाणी (वार्ता) : कोणतेही काम छोटे-मोठे नसते किंवा कमी अधिक महत्त्वाचे नसते तर त्यामधून मिळणारा आनंद आणि सेवेचे समाधान मोठे असते, असे उद्गार निपाणी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक संजय देसाई यांनी काढले. मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर (ता. कागल) शाळेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. जाधव होते.
देसाई म्हणाले की “वृत्तपत्र वितरणाचे काम हे जरी छोटे असले तरी दररोज सकाळी जगभरातली माहिती वेळेत लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण जबाबदारीचे आणि नियमित काम करत असल्याचे समाधान आहे. यावेळी देसाई यांनी वृत्तपत्र वितरणाच्या वेळेतील आपले अनुभव आणि कलामांच्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या.
प्रारंभी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन संजय देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी वृत्तपत्र वितरक संजय देसाई, प्रशांत व्हदडी, सागर देसाई यांचा शाळेच्या वतीने शाहू महाराजांच्या जीवनावरील पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कलामांची व्यक्तिरेखा साकारलेल्या श्रीनाथ कुंभार या विद्यार्थ्यालाही कलामांच्या जीवनावरील पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
शिक्षक प्रतिनिधी. एस. एस. सांडगे यांनी कलामांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या आयुष्याचा प्रवास सुंदर शब्दात विद्यार्थ्यांसमोर उलगडला. मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनीही वाचनाचे महत्त्व विशद केले.
यावेळी आरोग्य विभागामार्फत हातधुवा दिन साजरा करण्यात आला. डी. बी. बेनाडे यांनी हाताच्या स्वछतेचे महत्व प्रात्यक्षिकासह पटवून दिले. विद्यालयातील मीना-राजू मंचतर्फे शिवीबंद अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत शिव्या न देण्याबद्दल शपथ देण्यात आली. संस्काराचे महत्त्व यु. एम. सातपुते यांनी पटवून दिले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. डी. देसाई यांनी स्वागत केले. ग्रंथपाल बी. जी. माने यांनी आभार मानले.
याप्रसंगी एस. बी. पाटील, एस. एम. गोडबोले, आर. एस. भोसले कर्मचारी प्रतिनिधी एस. के. कांबळे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta