शुभेच्छापत्रे झाली कालबाह्य : तीन दिवसात मोबाईल फुल्ल
निपाणी (वार्ता) : पूर्वी दिवाळी म्हटल्यावर आकर्षक रंगसंगीतातले लहान आकाराचे, आकर्षक मोठ्या मजकूर असणारे, ग्रीटिंग कार्ड डोळ्यांसमोर यायचे. आपल्या जीवलगांना, आप्तस्वकीयांना पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे, स्वतः भेटून दिलेले ग्रीटिंग कार्ड वर्षानुवर्षे सांभाळून ठेवले जात होते. वारंवार ते काढून पाहिले जायचे, आठवणीला उजाळा दिला जायचा. मात्र सोशल मीडियाच्या युगात तरुणाईनेच ग्रीटिंग कार्डकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र निपाणी शहर व परिसरात दिसत आहे. आता छापील ग्रीटिंग कार्डऐवजी डिजिटल कार्ड्स पाठवले आहेत. याशिवाय सोशल मीडियावरच मोठ्या प्रमाणात शुभेच्छा सुरू असल्याने दिवाळीच्या शुभेच्छाही डिजिटल झाल्याचे चित्र आहे.
एकेकाळी दिवाळी आली की, ग्रीटिंग कार्डच्या दुकानांमध्ये कार्ड खरेदीसाठी झुबंड असायची. ती झुबंड आता ओसरली आहे. विक्री करणारे मागणीपुरतेच कार्ड दुकानात ठेवतात.
पूर्वी दिवाळी, नवीन वर्ष ग्रीटिंग कार्ड खरेदी, पोस्टिंग यासाठी खर्च मध्यवर्गीय आर्थिक नियोजनात करीत. समोरच्यास दिवाळीच्या एक-दोन दिवस आधीच ग्रीटिंग कार्ड मिळेल, असे नियोजन करून मित्र-मैत्रीण, नातेवाईक यांना दिले जायचे. व्यवसाय संबंध दृढ करण्यासाठी, राजकीय संबंध यासाठी ग्रीटिंग कार्ड दिले जायचे. मोठ्या प्रमाणात ग्रीटिंग कार्डची देवाण – घेवाण व्हायची. मात्र सहज उपलब्ध इंटरनेटमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाणघेवाण सोपी झाली आहे. दिवाळीच्या शुभेच्छांचा व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम, ट्विटर या माध्यमातून वर्षाव सुरू आहे. यामुळे ग्रीटिंग कार्ड खरेदीची गर्दी ओसरली आहे.
—-
नानाविध प्रकारचे डिझाईन, संदेश
वसुबारसने दिवाळीला प्रारंभ झाला आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या शुभेच्छांचे स्टेटससह व्हाट्सअप, इंस्टाग्रामवर दररोज हजारो संदेश धडकत आहेत. त्यामुळे अनेकांचे मोबाईल फुल्ल झाले आहेत. तर विविध प्रकारचे डिझाईन आणि संदेशाचा पाऊसच सोशल मीडियावर पडत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta