काही शेतकऱ्यांचा विरोध : व्यावसायिकांचा प्रश्न ऐरणीवर
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू झाले असून टोल नाका परिसरातील शेतकऱ्यांनी सहा पदरीकरण व्यतिरिक्त ज्यादा जाणाऱ्या जमिनीला विरोध दर्शवला आहे.
येथील शेतकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यात बोलणी होऊन रुंदीकरणात जाणाऱ्या शेती जमिनीचा सर्व्हे करण्यात येत आहे.
येथील काही शेतकऱ्यांनी या सर्व्हेला विरोध केला असून ज्या शेतकऱ्यांची संमती आहे. अशा शेतकऱ्यांच्या शेती जमिनीचा सर्व्हे करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत धडक मोर्चा काढून या कामाला विरोध दर्शवला आहे. गेल्या चार पाच महिन्यापासून रस्ता कामासाठी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार, बाळासाहेब हदिकर आधी प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग प्राधिकरणाला विरोध दर्शवला होता.
कोगनोळी टोल नाका परिसरात व्यावसायिक आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहेत. या ठिकाणी हजारो कामगारांचे येथील व्यवसायावर पोट चालत आहे. येथे होणाऱ्या साहपदरीकरणामुळे येथील सर्व व्यवसाय बंद होणार असल्याने येथील व्यावसायिक व कामगारांच्या वर उपासमारीची वेळ येणार आहे. यासाठी शासनाने व्यावसायिक व कामगारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
सहा पदरीकरण होत असताना शेतकऱ्यांच्या शेती जमिनी जात असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून देखील शासनाच्या गुंठ्याला पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांना समजले आहे. ही मदत कमी आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
अधिकारी व शेतकरी यांच्या संमतीने या ठिकाणी सर्व्हे सुरू झाला आहे. येथे अनेकांनी पक्की घरे बांधली आहेत. अशा लोकांनी घर देणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी कमलेश, सर्व्हेर अविनाश, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले, मधुकर इंगवले, नागेश पाटील, नारायण पाटील, राजाराम पाटील, अनंत पाटील, सलीम नाईकवाडे, बाबू पाटील, उमेश परीट, प्रकाश परीट, शकील नाईकवाडे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta