यात्रेनिमित्त आयोजन : लहान-मोठ्या पन्नास कुस्त्यांची मेजवानी, शौकिनांची गर्दी
निपाणी (वार्ता) : श्रीक्षेत्र कुर्ली आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त कुर्ली येथील शिंत्रे आखाडा येथे पार पडलेल्या कुस्ती मैदानातील पहिल्या क्रमांकाची कुस्ती सांगली येथील सुदेश ठाकूरने गुणांवर जिंकली. यावेळी लहान मोठ्या ५० कुस्त्या पार पडल्या. परतीच्या पावसामुळे हे कुस्ती मैदान लांबणीवर पडले होते. मात्र तरीही कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.
प्रथम क्रमांकाची कुस्ती सुदेश ठाकूर विरुद्ध बंटीकुमार (शाहू आखाडा) हरियाणा यांच्यात झाली. यामध्ये सुदेश ठाकुरने बंटीकुमार याच्यावर विजय मिळवला. दोन नंबरची कुस्ती प्रदीप ठाकूर (सांगली) विरुद्ध तात्या जुगळे (पंढरपूर) यांच्यात झाली. यामध्ये जुगळे याने एकलव्य डावावर ठाकूर याला चितपट केले. तीन नंबरची कुस्ती रोहन रंडे (मंडलिक आखाडा) विरुद्ध रोहित कुमार (शाहू आखाडा, मुरगूड) यांच्यात झाली. यामध्ये रोहन रंडे याने गुणांवर विजय मिळवला. चतुर्थ क्रमांकाची कुस्ती सौरभ माळी कुलविरुद्ध राजू गायकवाडबेळगाव यांच्यात झाली. यामध्ये माळी याने उलटी डावावर गायकवाडला चितपट केले.
याशिवाय लहान-मोठ्या ५० कुस्त्या झाल्या. प्रथम ते चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना चांदीची गदा व रोख रकमेचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी युवा नेते उत्तम पाटील, ऍड. संजय शिंत्रे, ऍड. अमर शिंत्रे, ऍड. डी. बी. लंबे, अरुण निकाडे, के. डी. पाटील, मधुकर पाटील, दिनकर पाटील, अमोल माळी, विनायक तेली, लक्ष्मण आबने, चेतन स्वामी, शिवाजी मगदूम, कृष्णात निकाडे, शिवाजी चौगुले यांच्यासह कुस्ती प्रेमी नागरिक उपस्थित होते.
पंच म्हणून अण्णासो माळी, लक्ष्मण नेजे, बाबू निकाडे, दत्ता पाटील, बाळू माळी, बाळासो पानारी, राजू दिवटे, शंकर कमते, नेताजी घराळे, दत्ता कोकीतकर, विठ्ठल पाटील, नागेश माळी यांनी तर समालोचक म्हणून कृष्णात पाटील (राशिवडे) यांनी काम पाहिले. यावेळी आणूर (ता. कागल) येथील हलगी वादक नामदेव देसाई आणि सहकान्यांनी उपस्थितांची मने जिंकली