पंकज पाटील यांची मागणी : महामार्ग प्राधिकरण अधिकारी बैठक
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण होत आहे. यासाठी शासनाने टोल नाका परिसरात शेती जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना गुंठ्याला 5 लाख 44 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पण या ठिकाणी अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाखो रुपयाचे कर्ज घेऊन उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे. या व्यावसायिकांना व या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केली.
बेळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात अधिकारी व व्यावसायिक यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपस्थित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापक एस. एम. नाईक यांनी टोल नाका परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांची शेती जमीन, शेतामध्ये असणाऱ्या विहिरी, पाईपलाईन, कुपनलिका, झाडे असे वेगवेगळे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिकांना देखील नुकसान भरपाई देण्यासाठी या व्यावसायिकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. काही सर्व्हे राहिले असल्यास येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांना घेऊन सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी नागेश पाटील, अरुण पाटील, नारायण पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रामा वडर, बाबू पाटील, राजू चौगुले, संतोष सोलापूरे, आनंदा भोसले, पुंडलिक माळी यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta