
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे त्यांच्या धर्मपत्नी डॉ. श्वेता मुरगुडे कन्या शिया यांच्या अपघाती निधनानंतर डॉ. मुरगुडे यांची बंद पडलेली नेत्रसेवा डॉ. सचिन यांचे गुरुवर्य एम.एम.जोशी नेत्रविज्ञान संस्था पुढे चालविण्यास सिध्द झाल्याचे निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले.

येथील श्री शंकरलिंग समुदाय भवनमध्ये आयोजित दिवंगत डॉ. सचिन मुरगुडे श्रध्दांजली कार्यक्रमात श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत डॉ. सचिन मुरगुडे, डॉ. श्वेता मुरगुडे, कु. शिया मुरगुडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डाॅ. मुरगुडे यांच्या प्रतिमेवर उपस्थित श्रींनी मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली. प्रारंभी हेमलता इंडी, शोभा हिरेमठ यांनी प्रार्थना गीत सादर केले.
श्री पुढे म्हणाले, आपण किती दिवस जगलो यापेक्षा आपण जीवनात केलेले समाजोपयोगी कार्य लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहते. डाॅ. सचिन मुरगुडे यांनी केलेली नेत्रसेवा लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे. त्यांची नेत्रसेवा पुढे चालविण्यास हुबळी येथील एम. एम. जोशी नेत्रविज्ञान संस्था पुढे सरसाविली आहे. डाॅ. सचिन, डॉ. श्वेता यांनी उपरोक्त संस्थेत सेवा बजावली होती. आता तिचं संस्था त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणार आहे. त्यामुळे संकेश्वर भागातील नेत्ररुग्नांना मोठा दिलासा मिळाल्याचे श्रींनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. श्रीनिवास जोशी म्हणाले, डॉ. सचिन मुरगुडे यांनी गावाचे ऋण फेडण्यासाठी संकेश्वरात नेत्रचिकित्सा केंद्र प्रारंभ केले होते. आपण त्यांच्या ठायी एक आदर्श व्यक्तिमत्व पाहिले. त्यांच्या कार्याचा वारसा एम. एम. जोशी नेत्रविज्ञान संस्था उत्तम प्रकारे निश्चितच चालवून दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शांत स्वभाव
डॉ. सचिन हा शांत स्वभावाचा होता. ध्येयपूर्तिसाठी झटणाऱ्या बंधुरायाच्या अपघाती निधनाने मुरगुडे परिवारवर मोठा आघात झाल्याचे डॉ. मेघना यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या अपघातात आम्ही भाऊ, वहिनी, कन्या सिया अशा सर्वानाच गमावून बसलो आहोत. डॉ. मुरगुडे परिवाराची तीन पिढ्यांची रुग्णसेवा एम. एम. जोशी नेत्रविज्ञान संस्था पुढे चालविण्यास सिध्द झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ यांनी डॉ. मुरगुडे परिवाराची रुग्णसेवक महान असल्याचे सांगितले.
व्यासपिठावर डॉ. सचिन मुरगुडे यांच्या आई श्रीमती शैला मुरगुडे, संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, डी. एन. कुलकर्णी, डॉ. गुरुप्रसाद, डॉ. कृष्णप्रसाद, शंकर जंजपण्णावर, डॉ. मेघना बाळेकाई, उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. गुरुप्रसाद यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुरेश शिडल्याळी यांनी करुन दिला.कार्यक्रमाला डॉ. रमेश दोडभंगी, डॉ. मास्तीहोळीमठ, डॉ. सुप्रिया हावळ, डॉ. स्मृती हावळ, डॉ. बस्तवाडी, अस्लम मुल्ला, डॉ. प्रविण राऊत, बसवराज बस्तवाडी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक रोहण नेसरी, जनसंपर्क अधिकारी महेश डोंगरे, कुतबुद्दीन मुल्ला (सीईओ) अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकबर सनदी यांनी केले. आभार संजय कुलकर्णी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta