छाननीत पाच अर्ज वैध
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग १३ करिता पोटनिवडणूक होत आहे. आज छाननीत 9 पैकी 5 अर्ज वैध ठरविण्यात आले. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार असे शिवानंद उर्फ नंदू मुडशी (भाजप), ॲड. प्रविण एस. नेसरी (काॅंग्रेस), शिवानंद लक्ष्मण समकण्णावर (निधर्मी जनता दल) अमृतराज उर्फ रोहण नेसरी (अपक्ष), प्रविण एस. नष्टी (अपक्ष) गुरुवार दि. १२ रोजी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यादिवशी भाजपाचे नेते मंडळी उपस्थित राहून कोणती खेळी खेळतात इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे. यादिवशी मंत्री उमेश कत्ती किंवा खासदार रमेश कत्ती उपस्थित राहून प्रभाग १३ करिता डावपेच आखण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अडीच वर्षापूर्वी पार पडलेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ साठी वापरला गेलेला फार्मूला पोटनिवडणुकीत वापरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रभाग १३ घ्या लढतीत भाजपाचे दोन उमेदवार दिसणार आहेत. त्यामुळे प्रभाग १३ चा सामना चौरंगी होणार आहे. येथे काॅंग्रेसचे उमेदवार प्रविण नेसरी, भाजपाचे नंदू मुडशी, निजदचे शिवानंद समकण्णावर, अपक्ष रोहण नेसरी आखड्यात दिसणार आहेत. भाजपने गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुनिल पर्वतराव यांना विजयी करण्यासाठी भाजपचेच हारुण मुल्ला यांना अपक्ष उमेदवार म्हणून आखाड्यात उतरविले होते. त्यामुळे येथे मतांच्या विभागणीचा लाभ सुनिल पर्वतराव यांना मिळाला होता. तोच फार्मूला प्रभाग १३ पोटनिवडणुकीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेऊन हळुवारपणे प्रचाराचा श्रीगणेशा केलेला दिसतो आहे. उमेदवारी अर्ज माघारनंतर प्रचारात मोठी चुरस निश्चितच दिसणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta