संकेश्वर (वार्ता) : पोदनपूर येथे समस्त भक्तगणांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा भगवान बाहुबली 13 फूट उतंग नयन मनोहर मूर्तीवर पंचामृताचा महामस्ताभिषेक सोहळा तपस्वी सम्राट आचार्य श्री ज्ञानेश्वर मुनिमहाराज यांच्या दिव्य सानिध्यात भक्तीमय वातावरणात पार पडला. दिगंबर जैन समाजातील भक्तगणांनी भगवान बाहुबली मूर्तीवर जलाभिषेक, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, दूध-दही, तूप, हळद कुंकूम केशरचा अभिषेक मनोभावे केला. पोदनपूर येथे गेले पाच दिवस चाललेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाची सांगता भगवान बाहुबली महामस्ताभिषेक कार्यक्रमाने करण्यात आली.
भगवान बाहुबली महामस्ताभिषेक कार्यक्रम पहाण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामस्तकाभिषेक कार्यक्रमात माजी मंत्री ए. बी. पाटील, अॅड. धन्यकुमार जिनप्पा गुंडे, अॅड. जी. एस. इंडी, अॅड. आर. बी. पाटील, गंगाधर मुडशी, डॉ. बी. ए. पुजारी, नगरसेवक संजय शिरकोळी, प्रकाश नेसरी, किरण संघवी, पंचकल्याण महोत्सव ट्रस्टचे अॅड. शांतीनाथ जाबण्णावर, अण्णासाहेब पलसे, सतीश पलसे, वसंत कोरडे, अण्णासाहेब पाटील, मोतीचंद माणगांवकर, जीवन मिरजी, प्रकाश मिरजी, नितिन पलसे, सुधाकर जाबण्णावर, अनेक मान्यवर भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी 4 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तब्बल दीड तास महामस्ताभिषेक सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा होतांना दिसला.
पंचकल्याण महोत्सव यशस्वी

संकेश्वर-गोटूर येथील पोदनपूर येथे गेले पाच दिवस चाललेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आणि महामस्तकाभिषेक सोहळा यशस्वी झाल्याचे तपस्वी सम्राट आचार्य श्री ज्ञानेश्वर मुनिमहाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. श्री. पुढे म्हणाले, हुक्केरी तालुक्याच्या अभिवृद्धीसाठी पंचकल्याण महोत्सव उपयुक्त ठरला आहे. जेथे संयम असते तेथेच शांती समाधान पहावयास मिळते. दिगंबर जैन समाज बांधवांनी पंचकल्याण महोत्सवात सयंम दाखवून दिले आहे. त्यामुळे महोत्सवात सहभागी भक्तगणांना शांती समाधानाची अनुभूती घेता आली आहे. पोदनपूर येथे निरंतर भगवान बाहुबलींची पूजा चालावी, हे क्षेत्र धार्मिक स्थळ ठरावे, असे श्रींनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta