बंगळूर : प्रदेश कॉंग्रेस समिती (केपीसीसी) पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. १) येथील केपीसीसी कार्यालयात पार पडली. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची तयारी करून पक्षाला चांगले यश मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला.
आगामी बीबीएमपी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांची तयारी, लोकसभा निवडणुकीत पक्षाला बसलेले धक्के, पक्ष संघटना अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याबाबत मुख्य चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी विभागनिहाय तथ्य शोध समिती स्थापन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला अपयश आले, विभागनिहाय तथ्य शोध समिती तेथील धक्कादायक घटक शोधून अहवाल देईल. या अहवालाच्या आधारे पक्षसंघटनेबाबत निर्णय घेतले जातील.
स्थानिक निवडणुका: ब्ल्यू प्रिंट
आगामी बृहन बंगळूर महापालिका, जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीची गाव व प्रभाग पातळीवर तयारी करण्याचा आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. प्रत्येक जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघासाठी एकत्रीकरण समित्या स्थापन करून निवडणुकीसाठी पक्षाला तातडीने तयार करण्यासाठी काय करावे, निवडणुकीचे ब्ल्यू प्रिंट काय असावे, याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
केपीसीसीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी बूथ स्तरावरील समस्या सोडवून पक्षाला बळकट करण्यासाठी काय करावे लागेल याचा क्षेत्रनिहाय अहवाल देण्यास सांगितले आहे. शिवकुमार यांनी बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज रहाण्याचे निर्देश दिले.
आगामी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांवरही बैठकीत चर्चा झाली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा विजय करण्यासाठी संघटितपणे प्रचार कार्य हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
चन्नपट्टणम, संडूर. शिग्गाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंत्री व आमदारांची नियुक्ती करून पोटनिवडणूक जिंकण्यासाठी तातडीने सर्व तयारी करावी यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.