
बंगळूर : शहरातील शाळांना बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल येणे सुरूच आहे, केंगेरी आणि राजराजेश्वरी नगरसह शहरातील ५० हून अधिक खासगी शाळांना आज सकाळी समाजकंटकांकडून बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल आले. मात्र हे दमक्यांचे ईमेल खोटे असल्याचे तपास केल्यानंतर पोलिसांनी सांगितले.
सकाळी ७.२४ वाजता roadkill333@atomicmail.io या वापरकर्त्याकडून ‘शाळेत बॉम्ब’ या विषयाचा एकच, समान ईमेल विविध शाळांच्या जवळपास ५० ईमेल आयडीवर पाठवण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
पाठवणाऱ्याने संबंधित शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये अनेक स्फोटक उपकरणे ठेवल्याचा दावा केल्याचे पोलिसांनी सांगितले.
“नमस्कार. मी तुम्हाला कळवण्यासाठी लिहित आहे की मी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये अनेक स्फोटक उपकरणे (ट्रिनिट्रोटोल्युएन) ठेवली आहेत. स्फोटके काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कुशलतेने लपवून ठेवण्यात आली आहेत,” असे त्यात म्हटले आहे.
अनेक शाळांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिल्या, ज्यांनी बॉम्ब निकामी पथके आणि तोडफोडविरोधी तपासणी पथकांसह संबंधित संस्थांकडे धाव घेतली, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना आवारातून तात्काळ बाहेर काढण्यात आले, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. “आज सकाळी मध्य विभागातील (बंगळुर पोलिस) हद्दीतील किमान चार शाळांना बॉम्बच्या धमकीचा ईमेल आला, ज्यामुळें घबराट पसरली. प्रोटोकॉलनुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. काहीही संशयास्पद आढळले नाही आणि तो बनावट ईमेल असल्याचे निष्पन्न झाले,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
याशिवाय, मध्य विभाग, बंगळुरू शहर पोलिसांच्या इतर पोलिस विभागांमधील शाळांनाही बॉम्बच्या धमकीचे ईमेल आल्याचे म्हटले जाते, जे नंतर बनावट असल्याचे निष्पन्न झाले, परंतु पोलिसांनी अद्याप शाळांची नेमकी संख्या निश्चित केलेली नाही.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मला याबद्दल (शाळांना बॉम्बच्या धमक्या) कळले आहे, मी अधिकाऱ्यांना ते बनावट बॉम्बच्या धमकीचे आहे का ते तपासण्यास सांगितले आहे.”
धमक्यांच्या अशा वारंवार घडणाऱ्या घटनांबद्दल विचारले असता ते म्हणाले, “आम्ही खोट्या बातम्या, खोटी माहिती देणे, चिथावणी देणे इत्यादींविरुद्ध कायदा आणत आहोत.”
गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की पोलिस अशा धमकीच्या संदेशांना हलके घेणार नाहीत आणि त्यांची पडताळणी करत आहेत.
“बंगळुरू आणि राज्याच्या इतर भागातही सुरुवातीला बॉम्बच्या धमक्यांचे फोन आणि मेल आल्याच्या घटना घडल्या होत्या. आताही त्याच पद्धतीने येतात. कोणत्या शाळांना कॉल आणि ईमेल आले आहेत याची आम्ही पडताळणी करू. आम्ही काहीही हलक्यात घेणार नाही, आम्ही सर्वकाही पडताळून पाहू,” असे ते म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी दिल्लीतील २० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये घबराट पसरली.

Belgaum Varta Belgaum Varta