Monday , December 8 2025
Breaking News

राज्यात काँग्रेसमध्ये सत्तावाटपाचा संघर्ष तीव्र; हायकमांडच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Spread the love

 

अध्यक्ष खर्गेंशी दोन्ही नेत्यांची चर्चा

बंगळूर : राज्य काँग्रेसमधील सत्तावाटपाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील स्पर्धा निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, या तणावाच्या पार्श्वभूमीवर एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हायकमांड कोणता फॉर्म्युला पुढे आणते, याकडे राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे लक्ष केंद्रित करून बसले आहे.
मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा पुनरुच्चार करून सिद्धरामय्या यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तर डी. के. शिवकुमार यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे सत्तापट अधिक रंगतदार झाले आहे. दोन्ही गटांकडून हायकमांडवर दबाव वाढवला जात असून, परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.

खर्गेंकडे नेत्यांची धावपळ
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काल रात्री एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची त्यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी भेट देत सत्तावाटपाची अंमलबजावणी करण्याचा ठाम आग्रह धरला. त्यांच्या सोबत त्यांचे बंधू व माजी खासदार डी. के. सुरेश व समर्थक आमदारही उपस्थित होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज संध्याकाळी खर्गे यांची भेट घेणार असून, सत्तावाटप रद्द करून मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणी मांडण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे दोन्ही नेत्यांना काही काळ शांत राहण्याचा सल्ला देतील, तसेच राहुल गांधी यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती मिळत आहे.

गटबाजीला उधाण; गुप्त बैठकींचा सिलसिला
दोन्ही गटांचे आमदार स्वतंत्रपणे बैठका घेत असून, दिल्लीतील एआयसीसी नेत्यांची भेट घेण्यासाठी येत्या दोन दिवसांत मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे. डी. के. शिवकुमार समर्थक आमदार आज दिल्लीला रवाना होऊ शकतात.
दरम्यान, मुख्यमंत्री गटातील काही प्रमुख मंत्रीही दिल्लीला जाण्याची तयारी करत असून, राहुल गांधी यांच्याकडे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याची विनंती करणार आहेत.

आकड्यांचा खेळ सुरू
दोन्ही नेत्यांकडून आपल्या समर्थनातील आमदारांची यादी तयार करून हायकमांडसमोर सादर केली जात आहे. शिवकुमार यांनी आपली यादी गुप्त ठेवली असून, सिद्धरामय्या गटाची यादी अंतिम टप्प्यात आहे.
खर्गे यांची भेट घेण्यापूर्वी मुख्यमंत्री आज आपल्या निकटवर्तीय मंत्र्यांसोबत बैठक घेणार असून, पुढील रणनीतीवर अंतिम चर्चा करणार आहेत.

निर्णायक क्षण जवळ
राज्यातील राजकीय स्थैर्यावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार असल्याने हायकमांड पुढील दोन-तीन दिवसांतच अंतिम फॉर्म्युला जाहीर करू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *