
बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांच्या विधानाचा मराठी भाषिकांकडून तीव्र निषेध
बिदर : बसवकल्याण मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शरणू सलगर यांनी बेळगाव येथे झालेल्या अधिवेशनात मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याची मागणी सरकारकडे केल्याची माहिती समोर येताच बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या मागणीला मराठी भाषिकांनी घटनाबाह्य, अल्पसंख्याक भाषेवर गदा आणणारी आणि द्वेषपूर्ण अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी भाषिकांनी स्पष्ट केले आहे की, कन्नड भाषा किंवा कन्नड माध्यमाच्या शाळांना त्यांनी कधीही विरोध केलेला नाही. उलटपक्षी, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये कन्नड ही भाषा पूर्वी तृतीय भाषा असल्याने विद्यार्थ्यांना नोकरी, पदोन्नती व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अडचणी येत होत्या. या अडचणी लक्षात घेऊन मराठी भाषिकांनी अनेक वर्षे लोकशाही मार्गाने संघर्ष केला आणि अखेर कन्नड भाषा द्वितीय भाषा म्हणून मान्य करून घेतली.
आज मराठी माध्यमातील विद्यार्थी कन्नड भाषा १०० गुणांसाठी शिकत असून कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांशी समान पातळीवर स्पर्धा करत आहेत. त्यामुळे नोकरी, पदोन्नती किंवा प्रशासकीय अडचणी उरलेल्या नाहीत. असे असताना मराठी माध्यम बंद करण्याची मागणी का केली जाते, असा थेट सवाल मराठी भाषिकांनी उपस्थित केला आहे.
“मराठी भाषेबद्दल इतका द्वेष का?”
मराठी भाषिक संघटना व नागरिकांचे म्हणणे आहे की, संविधानाने संरक्षण दिलेल्या भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांवर आघात करणारे विधान लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. लोकशाही व्यवस्थेत सर्व भाषा व संस्कृतींचा सन्मान राखणे हे आमदारांचे कर्तव्य असताना अशा प्रकारच्या मागण्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आहेत.
निवेदन देणार – 26 डिसेंबर 2025
या पार्श्वभूमीवर बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांच्या वतीने
दिनांक 26/12/2025 रोजी दुपारी 12:00 वाजता
माननीय जिल्हाधिकारी, बिदर यांच्यामार्फत
माननीय मुख्यमंत्री श्री. सिद्धरामय्यजी, शिक्षण मंत्री श्री. मधु बंगारप्पा जी, भाषा अल्पसंख्याक आयोग यांना अधिकृत निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे आमदार शरणू सलगर यांच्या विधानाचा जाहीर निषेध करण्यात येणार असून मराठी माध्यमाच्या शाळांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन
या शांततामय व लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवेदन प्रक्रियेत सर्व मराठी भाषिकांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती मराठी समाजाची ओळख, संस्कृती आणि अस्तित्व आहे. तिच्या रक्षणासाठी मराठी भाषिक एकजूट दाखवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta