Tuesday , March 3 2026
Breaking News

नेतृत्व बदलाबाबत शिवकुमार यांची राहुल गांधींशी महत्त्वपूर्ण भेट; हायकमांड लवकरच निर्णय घेणार

Spread the love

 

बंगळूर : राज्य काँग्रेसमधील नेतृत्वाच्या प्रश्नावर सुरू असलेली राजकीय चढाओढ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याने पक्षात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील असलेले शिवकुमार यांनी अखेर आज सकाळी दिल्लीतील जनपथ येथील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील सत्तावाटप, संभाव्य नेतृत्वबदल, केपीसीसी अध्यक्षपद आणि इतर राजकीय घडामोडींवर सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाल्याचे समजते. या वेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवकुमार यांनी पक्षनिष्ठा आणि केलेल्या कार्याची दखल घेऊन सत्तावाटपाच्या करारानुसार आपल्याला उच्च पदाची संधी द्यावी, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली. तसेच राज्यातील सत्तावाटपाच्या वादाला लवकरात लवकर पूर्णविराम देऊन स्पष्ट निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

राहुल गांधी यांनी शिवकुमार यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या पक्षनिष्ठेची दखल घेतली असून, “थोडा संयम ठेवा, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन दिल्याची माहिती आहे. सत्तावाटपाबाबत तात्काळ निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही दिल्लीला बोलावून चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत देण्यात आले.

यापूर्वी दोन दिवसांपूर्वी शिवकुमार दिल्लीला दाखल झाले होते. त्यांनी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. राहुल गांधी यांच्या भेटीसाठी वेळ निश्चित करण्याची विनंती त्यांनी केली होती. या चर्चेदरम्यान त्यांचे बंधू आणि माजी खासदार डी.के. सुरेशही उपस्थित होते.

दरम्यान, असाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेस नेत्यांशी चर्चा करण्यात आली. शिवकुमार यांनी प्रथम प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेत असाममधील रणनीतीवर चर्चा केली आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत राज्यातील राजकारणावर सविस्तर संवाद साधला.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, “पक्षश्रेष्ठींना जे काही सांगायचे होते ते सर्व सांगितले आहे. मी दिल्लीला आलो आहे ते राजकारणासाठीच. कोणाशी काय चर्चा झाली हे रस्त्यावर उभे राहून सांगण्याची गरज नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे काळच देईल.”

राज्यात २०२८ मध्ये पुन्हा काँग्रेसला सत्तेत आणण्याचा निर्धार व्यक्त करत शिवकुमार यांनी सत्तावाटपाच्या करारानुसार संधी देण्याची विनंती केली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींच्या आश्वासनानंतर शिवकुमार समाधानी असल्याचेही कळते.

आता काँग्रेस हायकमांड पुढील काही दिवसांत कोणता निर्णय घेते, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

धारवाडमध्ये सरकारी भरतीसाठी विद्यार्थ्यांचे भव्य आंदोलन; हजारोंचा सहभाग

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *