
बेंगळुरू : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील राजधानी बेंगळूरू येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अतिशय उत्साहाने साहित्यिक कार्यक्रम करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या कवितेची साद घालत कार्यक्रमाची सुरवात कवी संमेलनापासून झाली. कवींना एका सूत्रात बांधायचे कार्य ‘श्वेतुष'(तुषार भट) यांनी केले. जे ‘लव यु जिंदगी’ ब्लॉग रायटर म्हणून ओळखले जाणारे प्रचलित लेखक व बेंगळूरू विभाग कोषाध्यक्ष आहेत. करामसापतर्फे अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश देवनपल्ली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सरांच्या स्वहस्ते निमंत्रित कवींना प्रमाणपत्र व शाल देऊन गौरविण्यात आले.
कवी संमेलनात बेंगळूरू मधल्या कवींना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. नम्रता कुळकर्णी (हया), संदीप लिमये, अर्चना देसाई, परवीन कौसर, राकेश शेटे, प्रतिभा टेकाडे, लीना पेंढारकर यांनी आपली स्वरचित कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रतिभा टेकाडे यांची शिवरायांच्या तलवारीला मराठीची धार आहे.. तर राकेश शेटे यांची मानव धर्म महान आहे. डॉ. नम्रता कुळकर्णी यांची निळाईवरच्या कवितेने शब्दमाधुर्य जपले तर शब्द कोसळतात प्रपातासारखे असे अर्चना देसाई यांच्या कवितेतून उमजले. संदीप लिमये म्हणतात पाऊस असतोच मनामनात साठलेला.. प्रश्न परिस्थितीचा आहे तर डोळ्यातल्या पाण्यासारखा प्रवाहीपणा परवीन कौसर यांनी आपल्या आईबद्दलचा कवितेतून व्यक्त केल्या. लीना पेंढारकर यांची ‘मन’ या कवितेने मनाच्या जवळ नेले.
पुढील कार्यक्रम जगप्रसिद्ध अनुवादकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीचा असून कवींच्या आग्रहाखातर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक तुषार भट यांनी आपली अनुवादीत कविता सादर केली जे काव्यरसिकांनाही भावली असे करामसाप बेंगळूरू विभाग अध्यक्षा दिपाली वझे म्हणाल्या.
Belgaum Varta Belgaum Varta