हुबळी : भाजप सरकार पाठ्यपुस्तकात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा इतिहास फिरवून मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. याची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केपीसीसीचे कार्याध्यक्ष आ. ईश्वर खांड्रे यांनी केली.
हुबळी शहरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. ईश्वर खांड्रे म्हणाले, पाठ्यपुस्तकात सुधारणांच्या नावाखाली भाजप सरकारने धिंगाणा घातला आहे. रोहित चक्रतीर्थ शिकवण्या घेणारी व्यक्ती. त्यांना यांनी पाठयपुस्तक सुधारणा समितीचे अध्यक्ष बनवून मोठा गोंधळ घातला आहे. सध्या नैतिक आणि मानवतावादी मूल्ये सर्वत्र कमी होत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये मानवतावादी मूल्ये रुजविणारा मजकूर अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा होता. मात्र भाजपने पाठ्यपुस्तकात धार्मिकता आणि जातीय वीषबीज पेरल्याचा आरोप त्यांनी केला. पाठ्यपुस्तकांत सुधारणा करण्याच्या नावाखाली भाजप सरकारने राज्यातील 1 कोटी 30 लाख मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. कुवेंपू, भगतसिंह यांच्यासह विविध नेत्यांचा इतिहास बदलणे हा अक्षम्य अपराध आहे. शाळा सुरु झाल्या तरी अद्याप विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके पोहोचलेली नाहीत. भाजप सरकारच्या गैरकारभाराला राज्यातील जनता वैतागली आहे, असे खांड्रे म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta