बंगळूर : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज (ता.२१) पुन्हा कर्नाटकात दाखल झाली. तीन दिवसांपूर्वी बेळ्ळारी येथून आंध्रमध्ये दाखल झालेली ही यात्रा आज पुन्हा मंत्रालयमार्गे कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात दाखल झाली. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या (ता. २२) भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. पदयात्रेच्या मार्गावर लोकांनी राहूल गांधींचे भव्य स्वागत केले. पदयात्रेच्या मार्गावर लोकांनी दुतर्फा एकच गर्दी केली होती.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सकाळी सहा वाजता मंत्रालयातून पुन्हा सुरू झाली आणि सुमारे १० वाजता रायचूर तालुक्याचे सीमावर्ती गाव गिलेसगुरी येथे पोहोचली. उद्या रायचूर शहरात पदयात्रा काढण्यात येणार असून भारत जोडो यात्रेचा मेळावाही होणार आहे.
मंत्रालयाहून रायचूरला आलेल्या भारत जोडो यात्रेचे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी भव्य स्वागत केले. आजपासून तीन दिवस रायचूर जिल्ह्यातील विविध भागात २३ तारखेपर्यंत पदयात्रा सुरू राहणार आहे.
प्रियांका गांधी उद्या (ता. २२) रायचूर शहरात होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. रायचूर जिल्ह्यात तीन दिवस भारत जोडो यात्रा काढण्यात आली. २३ रोजी रायचूर जिल्ह्यातील कृष्णानदी पुलावरून यात्रा तेलंगणा राज्यात प्रवेश करेल.
राहुल गांधी आणि पदयात्रेकरू आज मंत्रालयाहून गिलेसोगुरी येथे पोहोचले, तेथे दुपारचे जेवण केले आणि विश्रांती घेतली. दुपारी साडेचार वाजता पदयात्रा पुन्हा सुरू झाली आणि यारागेरा येथे पोहोचेली, जिथे राहुल गांधी आणि पदयात्रेकरू मुक्काम करतील.
मंत्रालय ते गिल्लेसूगुरपर्यंत लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. तुंगभद्रा पुलापासून गिल्लेसूगुरपर्यंतचे अंतर चार ते पाच किमी आहे. संपूर्ण रस्ता लोकांनी फुलला होता. वाटेतही राहुल गांधींनी शेतकरी, महिला, लहान मुले आदींशी संवाद साधला. भारत जोडो यात्रेबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याने भारत जोडो यात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. गिल्लेसूगुर तांडा भारत जोडो यात्रेत दाखल होताच पदयात्रेला जनसागराचे स्वरूप आले. भारत जोडो यात्रेत सुरपूरच्या मुथुराजने महात्मा गांधींची वेशभूषा केली होती, तर गिल्लेसूगुर येथील एका मुलीने इंदिराजींची वेशभूषा केली होती. अशा प्रकारे भारत जोडो यात्रेत अनेक वेशात सहभागी होऊन विविधता दाखवली. भारत जोडो यात्रा पाहण्यासाठी ग्रामीण भागातील लोक घराच्या गच्चीवर उभे राहून जयघोष करीत होते. ठिकठिकाणी महिलांनी राहुल गांधींना ओवाळले. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले राहुल गांधी अतिशय उत्साहाने चालत असताना त्यांच्या बरोबर लोक धावत असल्याचे दिसून आले.
कडेकोट बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी निमंत्रित व्यक्तींशिवाय इतर कोणीही जवळ येऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती.काल मंत्रालयात मुक्कामी असलेल्या राहुल गांधी यांनी श्री राघवेंद्र स्वामी वृंदावनाचे दर्शन घेतले आणि राहुल यांनी स्वतः दिवाबत्ती लावली. राहुल गांधी यांनी ग्रामदैवत मंचलम्मा देवीचेही दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधींनी सुभेंद्र तीर्थ यांना चांदीची तलवार अर्पण केली, परंतु स्वामीजींनी ती स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला.
यावेळी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंह सुरजेवा उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta