सर्वपक्षीय बैठकीनंतर सिद्धरामय्यांची माहिती
बंगळूर : गेल्या १२३ वर्षांत राज्यासह कावेरी खोऱ्यात पावसाची तीव्र कमतरता आहे. अशा स्थितीत तामिळनाडूला पाणी सोडता येणार नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले.
कावेरी नदी जलव्यवस्थापन समितीने तामिळनाडूला आणखी १५ दिवस पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या शिफारशीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती.
विधानसौध येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात दुष्काळ आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पावसाचा अभाव आहे. धरणांमध्ये पाणी नाही. आगामी काळात पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. अशा बिकट परिस्थितीत तामिळनाडूला पाणी पुरवठा करता येणार नाही, असे ते म्हणाले.
कावेरी जल व्यवस्थापन समितीने (सीडब्ल्यूआरसी) तामिळनाडूला दररोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. याची फेरतपासणी करण्याची विनंती करण्याचे आम्ही ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र लिहून परिस्थिती स्पष्ट करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आम्ही समितीसमोर दुसरा अर्ज ठेवू. सर्वोच्च न्यायालयाला वस्तुस्थिती सांगण्याचे काम करू. ११ सप्टेंबरपर्यंत आपल्याकडे ९९ टीएमसी ऐवजी केवळ ३७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. आम्ही अद्याप पाण्याचा पूर्णपणे निचरा केलेला नाही. पीक टिकवण्यासाठी आम्हाला ७० टीएमसीची गरज आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ३० टीएमसी आणि उद्योगासाठी ३ टीएमसी पाणी आवश्यक आहे. आता आमच्याकडे चार जलाशयातून फक्त ५३ टीएमसी पाणी आहे, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी सांगितले.
आवक ३० वर्षात कमी
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, कावेरी नदीची आवक ३० वर्षांतील सर्वात कमी आहे. नैऋत्य मान्सून संपणार आहे. ते म्हणाले की, जलाशयांमध्ये आवक कमी होत असून सध्याचे पाणी आपल्या गरजेसाठी राखून ठेवण्याची गरज आहे.
तीन दशकात सरासरी ५४ टक्के पावसाची तूट आहे. राज्यातील पिकांना ७०.२० टीएमसी पाणी लागते. सप्टेंबर ते जुलै २०२४ पर्यंत पिण्याच्या पाण्याच्या उद्देशासाठी ३३ यीएमसी आणि औद्योगिक वापरासाठी ३ यीएमसी आवश्यक आहे. एकूण कर्नाटकला १०६.२० टीएमसी पाण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कावेरी खोऱ्यातील राज्याच्या चार जलाशयांमध्ये ५३.२८७ टीएमसी साठा उपलब्ध आहे.
Belgaum Varta Belgaum Varta