दांडेली : हुबळी येथील एका कुटुंबातील 6 जणांचा दांडेली तालुक्यातील अक्वाड गावाजवळील काली नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची घटना आज घडली. एकूण 8 जण हुबळीहून दांडेली येथे सहलीला आले होते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दांडेली तालुक्यातील अक्वाड गावात हुबळीहून 8 जणांचे कुटुंब सहलीला आले होते. ते जेवण करून विश्रांती घेत असता अचानक एक लहान मुलगा काली नदीत पडला. त्या मुलाला वाचवण्यासाठी एकामागून एक अशा 6 जणांनी नदीत उडी घेतली आणि त्यातच त्यांना मृत्यूने कवटाळले. त्यापैकी दोन महिला पाण्यात गेल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. नझीर अहमद (40), अल्लिया अहमद (10), मोहिन (6), रेशा उन्निसा (38), इफ्रा अहमद (15), आबिद अहमद (12) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. सर्व जण हुबळी येथील ईश्वरनगर येथील रहिवासी आहेत. सध्या पोलिसांनी काली नदीतून सर्वांचे मृतदेह बाहेर काढले सून मृतदेह शवविच्छेदनासाठी दांडेली रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
याप्रकरणी दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.