बेंगळूर (वार्ता) : राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचा लावण्याचा सरकारचा विचार नसल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले. बेंगळूरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, कोरोना संसर्गाचा दर वाढण्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. तो वाढेलही. राज्यात लसीकरण यशस्वी झाले असल्याने संसर्गाची तीव्रता वाढणार नाही. लॉकडाऊनचा तर सरकारने विचारही केलेला नाही. लोकांना अडचणही येऊ नये आणि त्यांचे रक्षणही व्हावे अशाप्रकारचा अनोखा, वेगळा प्रयत्न सरकार करत आहे असे त्यांनी सांगितले.
ओमीक्रॉन आणि कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेप्रमाणे आणि अहवालातील निष्कर्षांप्रमाणे वेगाने पसरत आहे. कालच राज्यात 3.95% संसर्ग दर नोंदविण्यात आला आहे. बेंगळूर शहर, ग्रामांतर, मंड्या, म्हैसूर, उडुपी, कोलार जिल्ह्यात संसर्ग दर अधिक आहे. या जिल्ह्यांच्या प्रशासनांशी बोलून कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. संसर्ग दर कमी करणे हा उद्देश आहे असे सुधाकर म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेने कालच विशेष सभा बोलावून 1 तास पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. कोणत्याही राज्यात, देशात संपूर्ण लसीकरण केल्याशिवाय या सांसर्गिक रोगावर नियंत्रण आणणे शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जगातील प्रत्येक देशात संपूर्ण लसीकरण झाल्यावरच या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले असल्याचं डॉ. सुधाकर यांनी सांगितले. एकंदर कोरोना संसर्गदर वाढत असला तरी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जारी करणार नसल्याचे आरोग्यमंत्री सुधाकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
Check Also
अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स
Spread the love बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …