बेळगाव : काँग्रेसने लोक विश्वास गमावला आहे. काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन ठरला आहे. काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कर्नाटकात काँग्रेस विभागली गेली आहे. संपूर्ण देशातच काँग्रेसने आपले अस्तित्व गमावले आहे. पुढील काळात काँग्रेसला कर्नाटकात कदापिही यश मिळणार नाही. याउलट आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा बहुमताने सत्ता हस्तगत करेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त अरुण सिंह बेळगावला आले आहेत. आज सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. त्याचबरोबर भाजप प्रणित केंद्र आणि कर्नाटकातील राज्य शासनाने केलेल्या कामांची माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेल्या जनकल्याण योजनांमुळे देशाची जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
कर्नाटक राज्यात येडियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासारखे खंबीर नेतृत्व कार्य करत आहे. केंद्र सरकारने कर्नाटक राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्प राबविले आहेत. कर्नाटकचा बाजूंनी विकास होत आहे. बेळगाव जिल्ह्यात रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण काम होत आहे. अशावेळी नेतृत्वहीन काँग्रेस पक्ष गोंधळात पडला आहे. काँग्रेस पक्षाने जनतेचा विश्वास गमावला आहे. देश आणि कर्नाटकातील जनतेला केंद्र आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर असणे गरजेचे वाटत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कर्नाटक राज्यात 150 हून अधिक जागांवर विजय प्राप्त करेल असा विश्वासही अरुण सिंग यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, खास. इराण्णा कडाडी, खास.मंगला अंगडी. माजी खास.प्रभाकर कोरे, प्रवक्ते ऍड. एम. बी. जिरली आदी उपस्थित होते.