
बेळगाव : बेळगाव शहरातील धर्मनाथ सर्कल जवळील तब्बल 10 गुंठे जागा 77,62,500 रुपये किंमतीमध्ये भारतीय जनता पक्षाला देण्यात आली आहे. महानगरपालिकेने आपल्या मालकीची ही जागा भाजपचे कार्यालय बांधण्यासाठी दिली असून गेल्या 3 मार्च 2022 रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावे याबाबतचा दस्त झाला आहे.
बेळगाव महापालिकेची धर्मनाथ सर्कल जवळील सीटीएस क्र. 10564 /ए येथे स्वतःच्या मालकीची जागा आहे. येथील 11,250 चौरस फूट जागा महापालिकेने भाजपला दिली आहे. भाजपकडून या 77 लाख 62 हजार 500 रुपये किमतीच्या जागेत जिल्ह्याचे मुख्य पक्ष कार्यालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भाजप कार्यालयासाठी जागा मंजूर होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. राज्य शासनाकडून ही जागा पक्ष कार्यालयासाठी देण्याचा आदेश झाला असल्यामुळे त्यानुसार महापालिकेने पुढील कार्यवाही केली आहे. आता भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पैसे भरून घेऊन उपनोंदणी कार्यालयात रीतसर दस्त केला आहे. एकंदर या पद्धतीने जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला आता पक्ष कार्यालयासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
दरम्यान, राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत असताना 2014 साली आरटीओ सरकार येथील जागा पक्ष कार्यालयासाठी देण्यात आली. आरटीओ सर्कल येथील ही सुमारे 10 गुंठे जागा काँग्रेसला केवळ 54 लाख रुपयांमध्ये देण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta