


जिल्हा प्रशासनाकडून राजपत्र प्रसिद्ध; इच्छुक उमेदवारांचे लक्ष निवडणूक प्रक्रियेकडे
बेळगाव : तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या प्रादेशिक निवडणूक क्षेत्रांची फेररचना आणि वर्गवार आरक्षणाची अधिसूचना जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष निवडणूक प्रक्रियेकडे लागले आहे.
तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ग्रामपंचायत निवडणुकांचीही तयारी सुरू झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज अधिनियम, १९९३ मधील कलम ५ च्या उपकलम (५) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या भौगोलिक हद्दीनुसार प्रादेशिक निवडणूक क्षेत्रांची फेररचना करण्यात आली असून, सदस्यसंख्या आणि विविध प्रवर्गांतील आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
या अधिसूचनेत अरळीकट्टी, येळ्ळूर, उचगाव, कडोली, मारीहाळ, सुळगे (उ), अंकलगी, न्युवंटमूरी, मुतगा, हंदिगनूर, केदनूर, बंबरगे, किणये आणि मुचंडी यांसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रभागांची व्याप्ती आणि संबंधित क्षेत्रांची विभागणी स्पष्ट करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग अ आणि ब तसेच महिलांसाठी राखीव जागांचा तपशीलही राजपत्रात नमूद करण्यात आला आहे.
प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर झाल्यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुकीची समीकरणे मांडण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोणत्या प्रभागातून कोणाला संधी मिळणार आणि आरक्षणाचा कोणत्या इच्छुक उमेदवारांना फायदा होणार, याबाबत ग्रामीण भागात उत्सुकता निर्माण झाली आहे. आता निवडणुकीच्या पुढील कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta