बेळगाव : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडिजीपी) अलोक कुमार यांनी केले.
टिळकवाडी पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी झालेल्या म. ए. समिती, कन्नड रक्षण वेदिका व इतर कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सीमाभागात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली पाहिजे. बेळगावात सर्वभाषिकांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागेल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे मात्र तोपर्यंत सर्वांनी शांतता राखली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सर्वांनी सामंजस्याने सीमाभागात शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
भारतीय नागरिक म्हणून गृहमंत्र्यांच्या आवाहनाचा आपण आदर राखला पाहिजे. क्षुल्लक कारणावरून बसेसवर दगडफेक करणे, काळे फासणे आदी कारवाया बंद झाल्या पाहिजेत, असे एडिजीपी अलोक कुमार यांनी सांगितले.
यावेळी माध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समितीकडून जी आंदोलने किंवा महामेळावा आयोजित केला जातो त्यावेळी मराठी भाषिकांच्या न्याय हक्काची कर्नाटक सरकारकडून पायमल्ली केली जाते तसेच भाषिक अल्पसंख्याक म्हणून आमचे जे हक्क अधिकार आहेत ते कर्नाटक सरकारने आम्हाला द्यावेत, असे यावेळी सांगण्यात आले.
बेळगाव असो किंवा अन्यत्र कोठेही आम्ही प्रक्षोभक असे काहींही करत नाही. आम्ही फक्त घटनेने दिलेले आमचे अधिकार मागतो. जे आमचा आहे ते आम्हाला मिळावं यासाठी लोकशाही मार्गाने आम्ही लढा देत आहोत. कर्नाटक सरकारच्या कायद्यानुसार आम्हाला जे मिळायला हवं ते दिलं जात नाही. कर्नाटक सरकार कासारगोडमधील कन्नडीगांसाठी केरळ सरकारकडून कांही गोष्टी मागून घेतय. तशाच कांही गोष्टी त्यांनी आम्हा मराठी भाषिकांना दिल्या तर आमच्यावर आंदोलन करण्याची वेळच येणार नाही असे स्पष्ट केले. तेंव्हा आता आपणच उच्च स्तरावर यासंदर्भात चर्चा घडवून आणावी. आजपर्यंत आमच्या मध्ये कन्नड -मराठी असे कधीही भांडण झाले नाही. जो काही वाद होतो तो पोलीस विरुद्ध करवे किंवा पोलीस विरुद्ध म. ए. समिती असा होतो. त्यामध्ये दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कन्नड मराठी कार्यकर्त्यांमध्ये कधीच हमरातुमरी अथवा मोठी हाणामारी झालेली नाही. तेंव्हा तुम्हीच उच्चस्तरावर सरकार आणि प्रशासनाला मराठी भाषिकांशी सहकार्य करण्याची विनंती करा अशी विनंती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एडिजीपी आलोक कुमार यांना केली.
याप्रसंगी बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रप्पा, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी, मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, तालुका म. ए. समितीचे सचिव ॲड. एम. जी. पाटील, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील तसेच कन्नड रक्षण वेदिके आणि अन्य कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta