खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय
खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार “चलो कोल्हापूर”साठी खानापूर येथील शिवस्मारकात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलिकमामा चव्हाण हे होते.
व्यासपीठावर माजी आमदार दिगंबरराव पाटील, तसेच मध्यवर्ती समितीने नियुक्त केलेले अष्ठप्रतिनिधींपैकी प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे व हणमंत मेलगे उपस्थित होते.
“चलो कोल्हापूर” धरणे आंदोलनासाठी जिल्हा पंचायत विभागवार जनजागृती करण्यात यावी. त्याचे प्रतिनिधित्व त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी करावे व कोल्हापूर येथील धरणे आंदोलन यशस्वी करू, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
सोमवारी सकाळी 7.30 वाजता शिवस्मारक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांनी स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनातून किंवा बसने धरणे आंदोलनासाठी रवाना झाल्यानंतर कोगनोळी येथून सर्व सीमावासीयांसमवेत एकत्रित कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे जाऊन हे धरणे आंदोलन यशस्वी करायचे आहे, असे ठरविण्यात आले.
प्रास्ताविक प्रकाश चव्हाण यांनी केले तर यशवंत बिर्जे यांनी मध्यवर्तीच्या बैठकीचा वृत्तांत सांगितला. त्यानंतर बाळासाहेब शेलार, विशाल पाटील, आबासाहेब दळवी, निवृत्त पीएसआय जे. एन. पाटील अनगडी, पांडू सावंत, माजी सभापती मारुती परमेकर आदिंची भाषणे झाली.
यावेळी मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, नारायण कापोलकर, जयसिंग पाटील, डी. एम. भोसले, विठ्ठल गुरव, राजाराम सरदेसाई, डी. एन. गुरव, अनंत पाटील गुरुजी, मरु पाटील, प्रल्हाद मादार, अरूण सरदेसाई, महादेव घाडी, सदानंद पाटील, ईश्वर बोभाटे, संतोष पाटील यांच्यासह समितीप्रेमी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.