बेळगाव : बेळगुंदी क्रॉस गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दूध उत्पादकांसाठी सोमवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत उचगाव येथील शंकर पार्वती मंगल कार्यालय येथे एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पशुसंगोपन तज्ञ अरविंद पाटील (नानीबाई चिखली ता. कागल) हे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी अरविंद पाटील हे ‘दुग्ध व्यवसायातील उदासीनता कुणामुळे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. जनावरांचे संगोपन कसे करावे, दूध वाढीसाठी काय उपाययोजना राबवाव्यात याबाबत दुग्ध व्यवसायिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 12 वी पर्यंतचे शिक्षण झालेल्या अरविंद पाटील यांनी महाराष्ट्रातील तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांची विविध ठिकाणी सुमारे दोन हजार व्याख्याने झाली आहेत. 1999 साली पाच गाई खरेदी करून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या गोठ्यात 125 जनावरे आहेत. यातील 75 जनावरे मुऱ्हा जातीची आहेत. त्यांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनीत अन्य पीक न घेता चाऱ्याचे नियोजन, पशुखाद्य, स्वच्छता, अत्याधुनिक उपकरणे दुधाचा दर्जा कसा वाढवावा, भरकटलेल्या तरुणांना हा व्यवसाय कसा लाभदायक या विषयांवर पाटील यांची व्याख्याने होत असतात.
गणेश दूध केंद्रातर्फे आयोजित शिबिरात दुग्ध व्यवसायातील सर्व उपाय सांगितले जाणार आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश दूध संकलन केंद्राचे प्रोप्रायटर उमेश देसाई, व्यवस्थापक सुधाकर करटे यांनी केले आहे.