बेळगाव : जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांचे चरित्र मानवजातीला प्रेरणादायी असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केले.
बेळगावात कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजींच्या नगर प्रवेश कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ते म्हणाले की, भगवान महावीरांनी मानव जातीला अहिंसेचा संदेश दिला आहे. लहान जीवालाही मारू नका. जगा आणि जगू घ्या हा संदेश आजही समर्पक आहे. त्यामुळे आजही भारतात अहिंसेची तत्त्वे पाळली जातात. भारत हा अध्यात्मिक देश आहे. जैन आणि बौद्ध शीख परंपरा येथे वाढल्या आहेत. अशा अध्यात्मिक देशात जैन धर्माने आपले श्रेष्ठत्व कायम ठेवले आहे. जैन, मुनी दिगंबर म्हणून पायी देशात फिरतात. त्यांच्यासारखा त्याग पाहणे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होणे हे आपल्या पूर्वजन्मीचे पुण्य आहे असे म्हणता येईल.
कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजी आणि नांदणी मठाचे जनसेना भट्टारक स्वामीजी यांचे बेळगावात आगमन झाले आहे, हा या भागाचा आशीर्वाद आहे. या भूमीत असे तपस्वी वावरत असतील तर आपली भूमी धन्य होईल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आमदार अभय पाटील यांनी नेहमीच विकासाचा विचार केला आहे. आज त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि दूरदृष्टीमुळे बेळगावचा खूप विकास झाला आहे. माजी आमदार संजय पाटील यांनीही भरीव विकासकामे केली असून विकासकामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी यापूर्वी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असताना बेळगावच्या विकासावर भर दिला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने बेळगाव जिल्ह्यात विशेषत: बेळगाव शहरात अनेक नवीन प्रकल्प आणण्यासाठी पुरेसे अनुदान दिले आहे. बेळगावच्या जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समारंभात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजी आणि जिनसेन भट्टारक स्वामीजी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर बेळगाव जैन समाज वतीने उच्च शिक्षण मंत्री अस्वत्थनारायण व मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वामीजींचे पाद पूजन करून त्यांना बेळगावात आणण्यात आले. माजी आमदार संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सोहळ्यात लक्ष्मीसेन भट्टारक आणि जिनसेन भट्टारक यांनी अर्शिवचन दिले. व्यासपीठावर विनोद दोड्डन्नावर, पुष्पका हणमन्नावर, राजेंद्र जक्कन्नवार, ऍड. रविराज पाटील, प्रमोद पाटील, सचिन पाटील, सन्मती कस्तुरी, राजू कटगेन्नावर, अभय अवलक्की, विनय बाळीकाई, संजय रोटे, बाबाजी शेट्टी आदी उपस्थित होते. कुमुदा नागभूषण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
याआधी लक्ष्मीसेन भट्टारक श्री यांचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. ही मिरवणूक गोमटेशा विद्यापीठापासून सुरू होऊन हिंदवाडी, महावीर भवन, गोवावेस सर्कल, एस.पी.एम. रोडमार्गे महात्मा फुले रोड येथे कार्यक्रमाची सांगता झाली.