बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने आयोजित करण्यात आलेली 25 वी हरेकृष्ण रथयात्रा यंदा जानेवारी 28, 29 व 30 रोजी भव्य प्रमाणात साजरी केली जाणार असून त्यासाठी भक्तगण तयारीला लागले आहेत. इस्कॉन मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते रविवारी दुपारी संपन्न झाली.
याप्रसंगी एच. डी. काटवा, एम. एल. अगरवाल, संकर्षण प्रभू, शंकर कडोलकर प्रभू आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराजांचे प्रवचन झाल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला. रथयात्रेचे यंदाचे पंचविसावे वर्ष असल्याने यंदा ही रथयात्रा तीन दिवस साजरी केली जाणार आहे. देशाच्या विविध भागाबरोबरच जगाच्या काही भागातून इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी तसेच भक्तगण उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.