बंगळुरू : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. बी. इनामदार यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.
अनेक दिवसांपासून प्रकृतीचा त्रास असलेल्या इनामदार यांच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
डी. बी. इनामदार यांना फुफ्फुस आणि यकृताचा त्रास होता. या पार्श्वभूमीवर त्यांना बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कित्तूर विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आलेले आमदार इनामदार यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री म्हणून काम केले.
माजी मंत्री डी. बी. इनामदार यांची राजकीय वाटचाल
जन्म 02/07/1950
1983 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
दुसरी वेळ 1985
तिसरी वेळ 1994
चौथी वेळ 1999
2013 मध्ये पाचव्यांदा असे एकूण पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले.
रामकृष्ण हेगडे यांच्या सरकारमध्ये त्यांनी 1983 मध्ये पहिल्यांदा खाण आणि भूगर्भ विज्ञान मंत्री, 1985 मध्ये दुसऱ्यांदा आरोग्य मंत्री आणि 1987 मध्ये तिसऱ्यांदा उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम पाहिले. 1999 मध्ये एस. एम. कृष्णा सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा तर 2000 मध्ये माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान तसेच पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या सुरु असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कित्तूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची सून लक्ष्मी इनामदार इच्छुक होत्या. पण काँग्रेसने इनामदार कुटुंबियांना टाळून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली. याच दरम्यान डी. बी. इनामदार यांची प्रकृती खालावल्याने बेंगळूरमधील मणिपाल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta