बेळगाव : बेळगाव जिल्हा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली लाखो रुपयांची दारू आज, रविवारी नष्ट करण्यात आली. शहराच्या हद्दीत लाखो रुपये किमतीचा अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला. जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरून अबकारी खात्याच्या कर्मचार्यांनी बेळगावजवळील बसवणकोळ्ळ परिसरात उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या उपस्थितीत लाखो रुपयांची अवैध दारू ओतून आणि पेटवून नष्ट करण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या मद्यांमध्ये व्हिस्की, ब्रँडी, रम आणि बिअरसह अनेक प्रकारच्या दारूचा समावेश आहे. निवडणुकीदरम्यान बेळगाव आणि चिक्कोडी येथे दारूबंदी करण्यात आली होती. त्या काळात अवैधरित्या या दारूची वाहतूक, साठा करण्यात आला होता.नष्ट केलेल्या दारूत 5148 लीटर दारू, 566 लीटर बिअर, 1588 लीटर हातभट्टीची दारू, 141 लीटर गोवा दारूचा समावेश आहे. जप्त करून शासनाकडे हा दारूसाठा सुपूर्द करण्यात आला होता. एकूण 254 प्रकरणात दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. उत्पादन शुल्क उपायुक्तांच्या आदेशावरून बेळगावजवळील बसवनकोळ्ळ येथे खड्डा काढून त्यात बाटल्या आणि गोण्यांमधील दारू टाकून त्यावर माती टाकण्यात आली. दारूची कव्हर आणि पाऊच पेटवून नष्ट करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्पादन शुल्क उपायुक्त एम. वनजाक्षी, उपायुक्त के. अरुणकुमार व सर्व जिल्हा निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या उपस्थितीत हा दारूसाठा नष्ट करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta