
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्यावतीने रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी मराठा मंदिर येथे पाचवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक कृष्णांत खोत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर दुसऱ्या सत्रात अनिल पवार हे ‘असा साकारला शिवराज्याभिषेक ग्रंथ’ या विषयावर मनोगत व्यक्त करतील. तर ‘शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या विषयावर डॉ. गणेश राऊत यांचे व्याख्यान होणार आहे.
स्नेह भोजनानंतर तिसऱ्या सत्रात कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. संमेलनाचे उद्घाटन आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार आहे. शिवराज्याभिषेक ग्रंथाचे प्रकाशन कृष्णांत खोत व ऍड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. सीमाकवी रविंद्र पाटील लिखित ‘अखंड महाराष्ट्राचा लढा’ या ध्वनी मुद्रित गीताचे प्रकाशन तुकाराम मेलगे- पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनात सहभागी साहित्यिकांचा थोडक्यात परिचय
संमेलनाध्यक्ष कृष्णात खोत

कळे वि. म. व ज्युनियर कॉलेज, कळे, ता. पन्हाळा येथे कार्यरत आहेत. त्यांच्या ‘गावठाण’, ‘रौंदाळा’, ‘झड-झिंबड’, ‘धूळमाती’, ‘रिंगाण’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘नांगरल्याविना भुई’ हा ललित गद्यसंग्रह आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘गावठाण’ या कादंबरीला आण्णाभाऊ साठे राज्य पुरस्कार मिळाला असून ही कादंबरी मुंबई, सोलापूर, जळगाव आणि बेळगाव विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
डॉ. गणेश राऊत

डॉ. गणेश राऊत हे हरिभाऊ व्ही. देसाई महाविद्यालयात इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहास विषयात ९ संदर्भ ग्रंथ लिहिले आहेत. तसेच १६ पुस्तकांचेही त्यांनी संपादन केले आहे. पत्रकारिता या विषयावर दोन पुस्तके लिहिली आहेत. मुक्त साहित्यिक म्हणून त्यांचे एक हजाराहून अधिक लेख विविध दैनिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.
अनिल पवार

अनिल पवार हे सह्याद्री प्रतिष्ठान, मुळशी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. इतिहास, दुर्ग संवर्धन, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण, सहकार, आध्यात्म अशा विविध क्षेत्रात प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यरत आहेत. ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा व्हावा यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांनी ‘शिवराज्याभिषेक’ हा ग्रंथ संकलित केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta