बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. पावसामुळे चित्ररथ मिरवणूक उशिरा सुरु झाली. तरी पहाटेपर्यंत शिवभक्तांचा उत्साह कायम होता.
नरगुंदकर भावे चौक येथे पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन पोलिस आयुक्त इडा मार्टिन व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, मदन बामणे, शिवराज पाटील, विकास कलघटगी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका माया कडोलकर, शिवानी पाटील, अजित कोकणे, महादेव पाटील, गणेश दड्डीकर, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, बाबू कोले, उमेश पाटील, धनंजय पाटील, संतोष कृष्णाचे, एम. वाय. घाडी, संजय मोरे, पांडुरंग पट्टन, माजी उपमहापौर सतीश गौरगोंडा, धनराज गवळी, श्रीकांत कदम, अनिल अमरोळे, श्रीधर खन्नूकर, महादेव चौगुले, मोरेश बारदेशकर आदी उपस्थित होते.
मिरवणुकीच्या अग्रभागी वडगाव येथील संत ज्ञानेश्वर भजनी होते. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत कार्यकर्ते मार्गस्थ होत होते. मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, धर्मवीर संभाजी महाराज चौक आदी भागातून पालखी काढण्यात आली. ठिकठिकाणी शिवप्रेमी पालखीचे दर्शन घेत होते. तसेच पालखी सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतरही काही वेळ पावसाची संततधार सुरू होती तरीही उत्साह मात्र कायम होता.
दरम्यान शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीस विलंब झाला. त्यामुळे रात्री दहानंतर चित्ररथ देखावे सादर करण्यास सुरुवात झाली. यावेळी सह्याद्रीपुत्र युवक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेला विषप्रयोग, एकदंत युवक मंडळ समर्थनगर यांनी कोंडाजी फर्जंद, अनंतशयन गल्ली येथील भगवे वादळ युवक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव, ताशिलदार गल्लीतील मंडळाने प्रतापराव गुर्जर यांचा पराक्रम, पाटील गल्ली येथील भगतसिंगचौक मंडळाने अफजल खान वध हा देखावा सादर केला. यासह बेळगाव शहरातील अनेक मंडळानी जिवंत देखावे सादर केले. त्यामुळे शहरासह विविध भागातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांचा इतिहास जवळून अनुभवता आला.
पारंपरिक वाद्यांचा वापर
यावर्षी चित्ररथ मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आले. तसेच अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवप्रेमीसाठी पुलाव, पिण्याचे पाणी व चहाचे वितरण केले. त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शिवप्रेमींची चांगली सोय झाली. तसेच मिरवणूक शांततेत पार पाडावी, यासाठी पहाटेपर्यंत पोलिस बंदोबस्त कायम होता.