बेळगाव : टीसीसह अन्य चौघा जणांवर हल्ला करणाऱ्या माथेफिरूचा शोध घेण्यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले असून रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेऊन माहिती घेतली आहे. गुरुवार दि. 16 मे रोजी सायंकाळी चालुक्य एक्स्प्रेसमधील एस-8 बोगीत लोंढाजवळ हा थरार घडला होता. संशयित आरोपी
टीसीने तिकीट विचारले म्हणून धावत्या रेल्वेत एका पाठोपाठ एक चौघा जणांवर चाकूहल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात देवर्षी वर्मा (वय 25, रा. उत्तरप्रदेश) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. टीसी अश्रफ अली कित्तूर (वय 27) यांच्यासह अन्य जखमी झाले आहेत. शुक्रवार दि. 17 मे रोजी सकाळी रेल्वे विभागाचे डीआयजी एस. डी. शरणप्पा व पोलीसप्रमुख डॉ. सौम्यलता एस. के. यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून एकंदर घटनेची माहिती घेतली.
गुरुवारी रात्रीपासूनच खानापूर, गुंजी, देसूर परिसरात हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे. हा थरार घडला त्यावेळी कोणीही संशयिताचा फोटो काढला नाही. त्यामुळे जखमी व प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीवरून तयार केलेल्या रेखाचित्राच्या आधारावरूनच शोधमोहीम राबविण्यात येत आहे. रेल्वे पोलीस, आरपीएफबरोबरच नागरी पोलीसही कामाला लागले आहेत. गुरुवारी रात्री खानापूर येथील एका दवाखान्यात उपचारासाठी एक जखमी तरुण पोहोचला होता. त्याचे छायाचित्र पोलिसांना मिळाले असून संशयिताच्या रेखाचित्राशी ते मिळते जुळते आहे का? याची पडताळणी करण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर सुमारे 40 ते 42 वर्षाचा आहे. त्याची उंची 5 फूट 3 इंच इतकी आहे. अंगाने सुदृढ, बारीक मिशी असे त्याचे वर्णन आहे. हल्लेखोराने आपल्या अंगावर पांढरा शर्ट व काळी पँट परिधान केली होती. त्याच्या अंगावरील कपडे मळकटलेले आहेत. लोंढा ते देसूर परिसरात त्याचा शोध घेण्यात येत आहे. धावत्या रेल्वेतून उडी टाकल्याने तो जखमी झाला असणार असा संशय आहे. या हल्लेखोराविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 9480802127 या क्रमांकावर रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.