बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) या संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जितोतर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात संस्थेचे चेअरमन वीरधवल उपाध्ये आणि उपक्रमाचे अध्यक्ष कुंतीनाथ कलमनी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गरजूंना वेळेला रक्ताची मदत उपलब्ध व्हावी यासाठी रक्तदान शिबिराचा उपक्रम मागील तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. बेळगाव शहरातील चार ब्लड बँकेच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी एकूण 936 जणांनी रक्तदान करून विक्रम नोंदविला होता. यावर्षी यापेक्षा अधिक रक्तदात्यांचे रक्तदान होईल अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले. दि. 15 ऑगस्ट रोजी हिंदवाडी येथील महावीर भवन येथे सकाळी आठ वाजल्यापासून रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांसाठी एक लाखापर्यंतच्या विम्याचा प्रीमियम उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच गरजूंना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तदानाचे कार्ड देखील देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या वेळी सेक्रेटरी अशोक कटारिया, हर्षवर्धन इंचल, केएलई ब्लड बँकेचे संचालक डॉ. श्रीकांत वीरगी अभय हादीमनी आदी उपस्थित होते.