बेळगाव : बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या संगीत मानापमान या चित्रपटाच्या विशेष शो ला अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी उपस्थिती दर्शवून प्रेक्षकांशी संवाद साधला. बेळगावच्या जनतेने संगीत मानापमान चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अभिनेते सुबोध भावे यांनी आभार मानले. यावेळी चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांशी सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांनी संवाद साधला. प्रेक्षकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांच्या सोबत सेल्फी आणि फोटो काढून घेतले. सरस्वती वाचनालय आणि अन्य संस्थांच्या वतीने सुबोध भावे यांचा यावेळी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सुबोध भावे यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.संगीत मानापमान चित्रपट पाहण्यासाठी जे येत आहेत त्यांना हा चित्रपट खूपच आवडतोय. चांगली कलाकृती लोकांना आवडते. बेळगावच्या जनतेचा अफाट उत्साह बघून मला अधिक शक्ती मिळाली आहे. सगळीकडे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुबोध भावे यांनी सांगितले.
चांगल्या कलाकृतीवर लोक प्रेम करतात. मराठी प्रेक्षकाबद्दल मला खात्री आहे. चित्रपटाला सगळीकडे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बेळगावच्या जनतेने दिलेला प्रतिसाद पाहून मी खूप आनंदी झालोय. चित्रपटाची कथा, संवाद आणि संगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू असल्याचे सुबोध भावे यांनी सांगितले.