बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही शहापूर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. असे म्हणतात की भगवान शंकराचा वास हा स्मशानात असतो, स्मशानातील भस्म शरीराला लावून भोळा शंकर स्मशानात राहत असे अश्या आख्यायिका प्रचलित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्रास हिंदू स्मशानात शिवालय असते. तसेच एक शिवालय शहापूर स्मशानभूमीत देखील आहे. दरवर्षी या शिवालयात महाशिवरात्री अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते. यावर्षीही सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीची पूजा पहाटे अभिषेक, आरती आदी कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. त्यानंतर भक्तांनी शिवदर्शनासाठी गर्दी केली आणि तिर्थप्रासादाचा लाभ घेतला.
महाशिवरात्री निमित्त भारतनगर येथील श्री भक्ती महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. शहापूरसह परिसरातील नागरिकांनी महादेव मंदिरात दर्शन घेतले. मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने गेली 24 वर्षे स्वयंस्फूर्तीने स्मशान सुधारणेचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाचे सावट आजही कायम आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून यावर्षीचा महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta