बेंगळुर : युक्रेनमध्ये आज रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. नवीन शेखरप्पा (वय 21) असे त्याचे नाव असून तो कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील राणीबेन्नूर तालुक्यातील चेळगिरी गावचा आहे. तो खारकीव येथे शिक्षणासाठी गेला होता.
परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज सकाळी खार्किवमध्ये झालेल्या बॉम्बहल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आम्ही आहोत. आम्ही रशिया आणि युक्रेनमधील भारतीय राजदुतांच्या संपर्कात आहोत. येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
रशियाचे 5,710 सैनिक ठार, युक्रेनचा दावा
रायटर्सने दिलेल्या माहितीनुसार, युद्धाच्या पाचव्या दिवशी युक्रेनचे मोठे नुकसान झाले. आतापर्यंत रशियाने 56 रॉकेटसह 113 क्रुझ क्षेपणास्त्र युक्रेनवर डागली आहेत, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी दिली.
कीव्हमध्ये रशियन सैन्याची आगेकूच
राजधानी कीव्ह शहराच्या दिशेने रशियन सैन्याची आगेकूच करत केवळ 64 किलोमीटर अंतरावर याने व्यापल्याचे सॅटेलाईट फोटोमधून स्पष्ट झाले आहे. कीव्हमधील नागरिकांनी शहर सोडावे, असे आवाहन सोमवारी रशियन सैन्याने केले होते. दरम्यान, जर्मनीसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी युक्रेनला लष्करी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.