बेळगाव : 1973 मध्ये एस्.एस्.एल् सी. उत्तीर्ण झालेल्या ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा तिसरा स्नेहमेळावा दि. 18 मे रोजी ठळकवाडी हायस्कूल येथे संपन्न झाला. या मेळाव्यात देशाच्या विविध भागात विखुरलेले 60 विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
52 वर्षांपूर्वी ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत पुन्हा एकत्र येऊन या विद्यार्थ्यांनी वेगळा आनंद लुटला.
ठळकवाडी हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक राजू कुडतरकर , तत्कालीन शिक्षक एम आर कुलकर्णी, काही कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या मेळाव्याने सर्वजण गहिवरून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात अल्पोपहाराने झाली. एम आर कुलकर्णी सरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर उपस्थित सर व कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत असतानाच शाळेतील आठवणींना उजाळा दिला आणि आयुष्यभरात केलेल्या उद्योग व्यवसायांची माहिती दिली. त्यामुळे सर्वजण हेलावून गेले.
अनेकांनी आपल्यातील कलागुणांना उजाळा देत मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. एम आर कुलकर्णी सर आणि राजू कुडतरकर यांचे प्रबोधन पर भाषण झाले. दुपारी सर्वांनी मिळून सह भोजनाचा आस्वाद घेतला. मेळाव्याच्या आयोजनासाठी अजित सिमु, वसंत हेब्बाळकर, अरुण मोहिरे, विजय भागवत यांनी पुढाकार होता. यापूर्वीही 2015 आणि 2018 मध्ये या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घडून आला होता.
सत्तरीत पोहचलेल्या अनेकांनी या मेळाव्यात सपत्नीक भाग घेतला आणि पुन्हा भेटू असे सांगत एकमेकांचा निरोप घेतला. श्री. गोपाळ देसाई, येळूर यांनी मोठे योगदान दिल्यामुळे त्यांचा सर्वांचे वतीने सन्मान करण्यात आला.