कल्याण : चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व मंगलराघोनगर परिसरात घडली आहे. सप्तशृंगी असं या इमारतीचे नाव आहे. या भीषण घटनेत ढिगार्याखाली अडकून सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यात तीन महिलासह एका दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर इमारतीमध्ये काही जण अद्यापही अडकलेले असल्याची माहिती समोर आलेली आहे.
कल्याण पूर्व मंगलराघोनगर परिसरात असलेल्या सप्तशृंगी या चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला. हा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. घटना घडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. प्राथमिकता यात काही लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केल्यानंतर यात एका दीड वर्षीय चिमुकलीसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजत आहे. दरम्यान, गेल्या दोन तीन तासांपासून अग्निशमन दल, पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्याकडून रेस्क्यू सुरू करत एकूण आठ जणांना बाहेर काढले असून चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. अजूनही काही लोक ढिगाराखाली अडकल्याची शक्यता असल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरुच ठेवण्यात आलेलं आहे.