
बंगळूर : दिवसेंदिवस वाढत असलेल्या उकाड्यानंतर दिलासा देणारा पाऊस उलट नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर विस्कळीत झाले असून, जोरदार वाऱ्यासह पडलेल्या गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाजीनगर येथील बौरींग रुग्णालयाजवळील कंपाऊंड भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृतांमध्ये काही जण फुटपाथलगत हातगाड्यांवर व्यवसाय करणारे होते. तसेच मृतांमध्ये पादचारीही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भिंत कोसळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून काही जणांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे.
दुर्घटना कशी घडली?
जुनी भिंत असल्याने तिच्यावर मोठा ताडपत्री (टार्पॉलिन) टाकून व्यापारी व्यवसाय करत होते. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने व्यापारी आणि काही पादचारी पावसापासून बचावासाठी त्या ताडपत्रीखाली उभे राहिले. त्याच वेळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भिंत कोसळली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
याशिवाय, शहरातील विविध भागांत ५० हून अधिक झाडे कोसळली असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. अल्पावधीत झालेल्या पावसामुळे शहराची अवस्था पूर्णपणे बिघडल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल
साधारणपणे एप्रिलच्या सुरुवातीपासून बंगळुरमध्ये पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा एप्रिल अखेरपर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागली. दरवर्षी पावसाळा सुरू होताच शहरात विविध समस्या निर्माण होतात. यंदा परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रशासनाने आधीच उपाययोजना करणे अपेक्षित होते. कमकुवत कंपाऊंड भिंती, तटबंदी आणि इमारतींबाबत अधिकाऱ्यांना माहिती नव्हती का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
झाडे कोसळण्यामागचे कारण काय?
हलका पाऊस पडला तरी शहरात झाडे कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. यामुळे वाहनांचे नुकसान तसेच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. यंदाही अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. झाडांच्या फांद्या छाटणे, वाळलेली झाडे हटवणे आणि झाडांच्या मुळांची देखभाल याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आनंदराव सर्कल, ओल्ड एअरपोर्ट रोड, एम. जी. रोड, वसंतनगर, नृपतुंग रोड, सीएम हाऊस रोड, शिवानंद सर्कल आदी भागांत झाडे कोसळली. शिवानंद सर्कलजवळील क्रेसेंट रोडवर झाड पडून ३ दुचाकी आणि एका कारचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. बानशंकरी मेट्रो स्थानकातही पाणी शिरल्याची नोंद आहे.
विक्रमी पावसाची नोंद
गेल्या दोन तासांत शहरात सुमारे ७८ मिमी पावसाची नोंद झाली. एचएएल विमानतळ परिसरात २४.७ मिमी पाऊस पडला. गारपिटीसह झालेल्या या पावसामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाणी साचण्यामागे कारण पाऊस की नाले?
मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात बंद पडली. ही समस्या दरवर्षीचीच असली तरी यामागे पावसाइतकीच नाल्यांच्या दुरवस्थेची जबाबदारी असल्याचे दिसून येते. कचऱ्याने तुंबलेले नाले, अपूर्ण दुरुस्ती कामे आणि पावसाळ्यापूर्वीची अपुरी तयारी यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
जबाबदार कोण?
शहराच्या या अवस्थेसाठी केवळ मुसळधार पाऊस कारणीभूत आहे की प्रशासनाचा निष्काळजीपणा, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दुर्घटनेतील मृतांना मदत जाहीर करून हात झटकणे हा उपाय नसून, दीर्घकालीन नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta