Monday , August 17 2026
Breaking News

प्रेयसीसोबत संसार थाटण्याच्या हव्यासातून पत्नीची हत्या; अपघाताचा बनाव पोलिसांनी उघड केला

Spread the love

 

बेळगाव : प्रेयसीसोबत राहण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करून ती रस्ते अपघातात मृत्युमुखी पडल्याचा बनाव रचणाऱ्या एका व्यक्तीला बेळगाव जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. गोकाक तालुक्यातील शिंदीकुराबेट गावात उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव सक्कुबाई पाटायत असे असून, त्यांचे पती संतोष पाटायत यांच्यावर खुनाचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषचे गावातील एका विधवा महिलेसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिच्यासोबत आयुष्य व्यतीत करण्यासाठी त्याने पत्नीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अधिक मासाचे निमित्त सांगून संतोष पत्नीला बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी येथील चामुंडेश्वरी मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेला. दर्शनानंतर परतीच्या प्रवासात त्याने शीतपेयामध्ये उंदराचे विष आणि बांगडीची पूड मिसळून ते प्रसाद असल्याचे भासवत पत्नीला पाजल्याचा आरोप आहे. विषाचा परिणाम होऊन सक्कुबाई बेशुद्ध पडताच रस्त्याच्या कडेला त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने मृतदेहावर मोटारसायकल टाकून हा रस्ते अपघात असल्याचा बनाव रचला. काही काळ घटनास्थळी थांबल्यानंतर त्याने स्वतःच पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून अपघाताची माहिती दिली.

मात्र तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने सखोल चौकशी करण्यात आली. बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेत (बीआयएमएस) झालेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.

संतोष पाटायत याला अटक करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणात त्याच्या कथित प्रेयसीचा कोणताही सहभाग होता का, याचाही पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *