Wednesday , June 17 2026
Breaking News

कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियान

Spread the love

 

नंदगड : कन्नड फलक सक्तीविरोधात २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बुधवारी नंदगड येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी बाजारपेठेसह विविध गल्ल्या आणि परिसरातील अन्य ठिकाणी पत्रके वाटून नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील गावांमध्येही कानडीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक सरकारी कार्यालये तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी केवळ कन्नड भाषेतील फलक लावले जात असून यामुळे मराठी भाषिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी भाषिकांच्या भाषा आणि सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे या विरोधात मराठी भाषिकांनी संघटितपणे आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच २२ जून रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये नंदगड आणि परिसरातील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जनजागृती मोहिमेदरम्यान समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना मोर्चाचे उद्दिष्ट, त्यामागील भूमिका आणि मराठी भाषिकांच्या मागण्यांविषयी माहिती दिली. नंदगड बाजारपेठ, प्रमुख रस्ते, विविध गल्ल्या तसेच सार्वजनिक ठिकाणी पत्रके वाटप करून मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. यावेळी प्रकाश चव्हाण, पुंडलिक पाटील, अर्जुन देसाई, पांडुरंग पाटील, रुकमान्ना झुंजवाडकर, मोहन गुरव, शांताराम पाटील, नारायण पाटील, संदेश कोडचवाडकर, नागेश भोसले, सुनील पाटील, श्री पाटील, श्रेयस हळ्याळकर, मुकेश गुरव, राहुल चापगांवकर, तुषार देसाई, बापू गुंडपीकर, प्रज्योत पाटील, दत्तप्रसाद बेळगावकर, शुभम कांबळे, यतीन पाटील, साईनाथ मळीक आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

डिगेगाळी – जटगे परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार

Spread the love  खानापूर : ऐन पेरणीच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने डिगेगाळी–जटगे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *