बेंगळुरू : सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत बूट व सॉक्स वाटप करण्याच्या योजनेत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. प्रतिकूल हवामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य तसेच वापरातील व्यवहार्य अडचणी लक्षात घेऊन बूट-सॉक्सऐवजी चांगल्या दर्जाच्या चप्पलांचे वितरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडून माहिती आणि अभिप्राय मागविण्यात आला आहे. विविध भागांतील भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि विद्यार्थ्यांच्या वापराची सोय यांचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी शाळेत स्वच्छ आणि नीटनेटका गणवेश परिधान करून यावे, यासाठी एसडीएमसीमार्फत बूट व सॉक्स खरेदीसाठी अनुदान दिले जाते. मात्र उपलब्ध निधीत वर्षभर टिकणारे आणि चांगल्या दर्जाचे बूट-सॉक्स खरेदी करणे अनेक शाळांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. परिणामी कमी दर्जाचे बूट काही महिन्यांतच खराब होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
याउलट त्याच निधीत विद्यार्थ्यांसाठी अधिक टिकाऊ आणि दर्जेदार रबर अथवा चामड्याच्या चप्पलांची खरेदी करणे शक्य असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक उपयुक्त पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे.
विशेषतः ग्रामीण, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटकातील काही भागांमध्ये पावसाळ्याच्या काळात बूट व सॉक्स वापरणे गैरसोयीचे ठरते. दिवसभर ओले बूट घालून राहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच उन्हाळ्यात दीर्घकाळ बूट व सॉक्स परिधान केल्याने उष्णतेमुळे त्रास होण्याच्या तक्रारीही समोर येतात.
या सर्व बाबींचा सखोल विचार करून तसेच विविध स्तरांवरील मते जाणून घेऊन विद्यार्थ्यांसाठी चप्पल वितरणाचा पर्याय स्वीकारण्याबाबत शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुविधा आणि निधीचा अधिक परिणामकारक वापर या तिन्ही बाबी लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याने या प्रस्तावाकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta