Monday , August 17 2026
Breaking News

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर खानापूर प्रशासन सतर्क; आपत्ती निवारण पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना कडक इशारा

Spread the love

 

खानापूर : मान्सून काळात उद्भवू शकणाऱ्या पूर व इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी खानापूर तालुका प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला असून, तालुका पंचायत सभागृहात आपत्ती निवारण पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हा पंचायतीचे मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

बैठकीला तहसीलदार दुंडाप्पा कोमार, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, शिक्षण विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने परशुराम दुडगुंटी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांना तात्काळ कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश दिले.

खानापूर तालुक्यात मलप्रभा नदीसह इतर नद्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी २४ तास सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले. रस्ते व शाळांच्या इमारतींची नियमित पाहणी, ग्रामपंचायतींकडून गटारांची स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

याशिवाय, आपत्तीमुळे घरांची पडझड झाल्यास बाधितांना शंभर टक्के नुकसानभरपाई मिळावी, जनावरांचे वेळेत लसीकरण करावे, वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, धोकादायक झाडांच्या फांद्या हटवाव्यात तसेच आरोग्य विभागाने साथीच्या आजारांबाबत जनजागृती मोहीम राबवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. कोणत्याही अधिकाऱ्याने आपत्तीच्या काळात मुख्यालय सोडू नये, असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, या महत्त्वाच्या बैठकीची माहिती तालुका प्रशासनाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली नसल्याने यंदा एकही पत्रकार उपस्थित नव्हता. दरवर्षी पत्रकारांना निमंत्रित केले जात असताना यावेळी झालेल्या या त्रुटीची चर्चा बैठकीनंतर सुरू होती.

बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे डॉ. मनोहर दादमी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसनावर, हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता प्रवीण बरगाले तसेच तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींचे विकास अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *