जायंट्स मेन आणि जायंट्स सखीच्या वतीने रक्तदान शिबिर यशस्वी
बेळगाव : जायंट्स मेन बेळगाव व जायंट्स सखी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पद्मश्री नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त के. एल. ई. डॉ. प्रभाकर कोरे रक्तपेढी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श घालून दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री नाना चुडासमा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन केले.
के. एल. ई. रक्तपेढीचे प्रमुख श्रीकांत विरगी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या घरगुती उपाययोजना, संतुलित आहार व आरोग्यदायी सवयींबाबत सविस्तर माहिती दिली. विशेषतः महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक महिला रक्तदानासाठी उत्सुक असूनही हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तदान करू शकल्या नाहीत. अशा महिलांनी आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, गूळ, खजूर, डाळिंब, गव्हांकुर तसेच लोहयुक्त पदार्थांचा समावेश करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी आपल्या मनोगतात महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहून हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच समाजसेवेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. रक्तदान ही केवळ सेवा नसून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी विभागीय संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुतगेकर, अशोक हलगेकर तसेच जायंट्सचे माजी अध्यक्ष मदन बामणे, विजय बन्सुर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अरुण काळे, सुनील मुतगेकर, मदन बामणे, अशोक हलगेकर, सुनील पवार, जीवन कदम, महेश बामणे, श्याम जाधव, सुलक्षणा शिनोळकर, अक्षय जाधव, रोहित चव्हाण, प्रदीप चव्हाण, सुनील मुरकुटे, महादेव केसरकर व राहुल बेलवलकर यांनी रक्तदान केले.
सर्व मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.
समाजहितासाठी राबविण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे रक्तपेढीच्या साठ्यात मोलाची भर पडली असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी जायंट्स मेन व जायंट्स सखीच्या कार्याचे कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta