बेळगाव : बेळगावातील खासबाग परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाटील गल्ली, खासबाग येथे सोमवारी ही चोरी उघडकीस आली असून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.
याप्रकरणी सीमा उत्तम वांजरे यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पतीच्या निधनानंतर दोन मुली आणि एका मुलासह कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या सीमा वांजरे यांच्यावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सीमा वांजरे या पेट्रोल पंपावर काम करतात. रविवारी रात्री काम आटोपल्यानंतर त्या घरी आल्या होत्या. त्यानंतर रात्री उशिरा काकतीवेस येथे राहणाऱ्या मोठ्या मुलीकडे जेवणासाठी गेल्या. उशीर झाल्याने त्यांनी मुलीच्या घरीच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम लंपास केली.
विशेष बाब म्हणजे चोरी करून जाताना चोरट्यांनी घराचा दरवाजा पुन्हा पूर्ववत लावून ठेवला होता. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत शेजाऱ्यांनाही चोरीची कुठलीही कल्पना आली नाही. दुपारी कामावरून परतल्यानंतर सीमा वांजरे यांना घराचे कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश करताच कपाटे फोडलेली, सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि मौल्यवान वस्तू गायब असल्याचे दिसून आल्याने त्यांना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे खासबाग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta