Wednesday , April 29 2026
Breaking News

प्रगणकांनी काम संपवले; महापालिकेचे किट अजूनही हवेत!

Spread the love

 

प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न

बेळगाव : बेळगाव शहर परिसरात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामामध्ये नियोजनाचा अभाव उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. अनेक प्रगणकांनी आपल्या वाट्याला आलेल्या विभागातील घरांची गणती पूर्ण केली असली तरी त्यांना आवश्यक साधनसामग्री अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जनगणनेच्या कामासाठी अधिकृत किट देणे अपेक्षित असताना बेळगाव महानगरपालिकेकडून प्रगणकांना केवळ एक मार्कर पेन आणि ओळखपत्राचा कागद तसेच कन्नडमधील माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. मराठीमधील माहिती पुस्तिका मागितली असता उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले परंतु बेळगाव तहसीलदार ऑफिस कडून तालुक्यातील लोकांना मराठी मधील माहिती पुस्तिका पुरविण्यात आल्या होत्या.
विशेष म्हणजे त्या ओळखपत्रासाठी टॅगसुद्धा देण्यात आलेला नाही. याशिवाय कागदपत्रे, फॉर्म, फाईल, पेन, कागद, पेन्सिल, खोडरबर, टोपी, पाण्याची बाटली, बॅग किंवा इतर कोणत्याही प्रकारची साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे प्रगणक सांगत आहेत.
परिणामी अनेक प्रगणकांना पेन, कागद आणि इतर साहित्य स्वतःच्या पैशातून खरेदी करून जनगणनेचे काम करावे लागले. प्रशासनाकडून आवश्यक साधनसामग्री न दिल्यामुळे प्रगणकांना कडक उन्हात घराघरात फिरून काम करताना अतिरिक्त त्रास सहन करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, बाहेरील काही गावांमध्ये आणि इतर भागांमध्ये जनगणनेच्या कामासाठी आवश्यक किट आधीच वितरित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बेळगाव शहरातच किट का देण्यात आले नाही ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे काही प्रगणकांनी आपल्या क्षेत्रातील जनगणनेचे काम पूर्णही केले आहे. मात्र किट अजूनही मिळालेले नसल्यामुळे “जनगणना संपल्यानंतर किट देऊन काय उपयोग?” असा संतप्त प्रश्न प्रगणकांकडून विचारला जात आहे.
एकंदरित जनगणनेचे काम पूर्णत्वाकडे जात असताना साधनसामग्रीच्या अभावामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच बेळगाव महानगरपालिकेचे जनगणती नियोजनाचे प्रमुख डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी याबाबत तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी प्रगणकांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी महापालिकेचा ‘मास्टर प्लॅन’

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त अशोक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *