Wednesday , August 19 2026
Breaking News

अमित शाह यांच्या भेटीसाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना हत्तरगी टोलवर अडवले; महामार्गावर ठिय्या आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला कर्नाटक पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईच्या निषेधार्थ समितीचे नेते व कार्यकर्ते महामार्गावरच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करत आहेत.

शनिवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध वाहनांतून कोल्हापूरकडे रवाना झाले होते. सीमाप्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी हे शिष्टमंडळ कोल्हापूरला जात होते.

मात्र, हत्तरगी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी ताफा अडवला. पोलिसांच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर बसून आंदोलन सुरू केले. यावेळी “सीमाभागातील मराठी जनतेवर अन्याय बंद करा” आणि “लोकशाही हक्कांचा गळा घोटू नका” अशा घोषणा देण्यात आल्या.

उपलब्ध माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, या संदर्भातील लेखी आदेश दाखविण्याची मागणी समितीचे नेते व विधिज्ञ अमर येळ्ळूरकर यांनी केली असता, पोलिसांनी तो आदेश दाखविण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

समितीच्या नेत्यांनी सांगितले की, अमित शाह यांच्या भेटीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे वेळ मागण्यात आली होती. तसेच दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांनीही भेट निश्चित करण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, कार्यकर्त्यांना कोल्हापूरच्या दिशेने जाण्यापासून रोखल्यामुळे सीमाभागात संतापाची लाट उसळली असून, दोन्ही राज्यांच्या प्रशासनाविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समितीच्या नेत्यांनी दिला आहे.

सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळाला अडवण्यात आल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गुड्स शेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *